Thursday, May 31, 2018

गोंधळाला ये गं अंबे, गोंधळाला ये..

 


गोंधळाला ये गं अंबे, गोंधळाला ये...
--------------------------------

""गोंधळ. देवीची आराधना करण्याची एक साधना. या साधनेतून केवळ भक्तिभावच जपला जात नाही, तर नृत्य, गायन, काव्य या कलेचीही जपणूक केली जाते. गोंधळाचे तसे पाच प्रकार आहेत. त्यातील पारंपरिक गोंधळाची परंपरा मोठी आहे. ही परंपरा पाच पिढ्यांपासून जपली आहे ती औरंगाबाद शहरातील न्यू हनुमाननगरमधील गल्ली नंबर दोनमध्ये राहणाऱ्या धुमाळ कुटुंबीयांनी.''
.................................. मधुकर कांबळे
0 गोंधळातून होते देवीची भक्तिभावाने आराधना
0 धुमाळ कुटुंबीयांनी पाच पिढ्यांपासून जपली परंपरा
0  कधी गीते, तर कधी निरुपणाच्या माध्यमातून उपक्रम
0  हातवारे, खाणाखुणांवरुन ओळखतात दात्यांची नावे
0 दीक्षा घेणे, गुरु करण्यासाठी घालतात रहाटीचा गोंधळ
.........
ज्वारीची चिपाडं किंवा उसाची तीन धाटं उभी करून वरच्या बाजूला बांधलेली. मधोमध चौरंग ठेवून त्यावर कलश, त्यात नागवेलीची पानं, हिरवा, पिवळा चोळीचा खण, खारीक, खोबरं, सुपारी, बदाम, वेगवेगळी फळं ठेवून घटपूजा मांडली जाते. या घटगादीजवळ गोंधळीबुवा संबळ, तुणतुणे, डफ, टाळ आदी वाद्यांसह आईचा गोंधळ घालण्यासाठी सज्ज झालेले असतात. पूजा मांडल्यावर तुणतुण्याच्या तारा छेडत संबळावर काडी पडताच
"उदो उदो अंबाबाई आई, नाद संबळी
गोंधळाला येऽऽऽ गं अंबे, गोंधळाला येऽऽऽ'
असे आवाहन करीत देवीच्या गोंधळाला सुरवात होते. सर्व विघ्ने दूर व्हावीत आणि शांतता नांदावी यासाठी मंगलप्रसंगी गोंधळ घालण्याची परंपरा आहे. गोंधळाच्या पाच प्रकारांपैकी पारंपरिक गोंधळाची परंपरा औरंगाबादच्या न्यू हनुमाननगरमधील गल्ली नंबर दोनमध्ये राहणारे रेणुकाई गोंधळ घालणारे मनोज नारायणराव धुमाळ यांनी पाच पिढ्यांपासून जोपासली आहे.
-----
पारंपरिक गोंधळ घालणारी पाचवी पिढी
-----
वडवणी (जि. बीड) येथील मूळचे गोंधळीबुवा शेषरावबाबा धुमाळ हे मनोज धुमाळ यांचे खापर पणजोबा; तर नारायणबाबा पणजोबा. खापर पणजोबा शेषरावबाबा यांच्यापासून चालत आलेली पारंपरिक गोंधळाची परंपरा चालविण्याचे काम त्यांच्या पाचव्या पिढीतील मनोज करीत आहेत. त्यांनी सांगितले, की सातवीत असतानापासून वडिलांबरोबर गोंधळ घालायला त्यांच्यासोबत जात होतो. ते कसे विधी करतात, पूजा कशी मांडतात हे पाहत होतो. पणजोबांपासून सर्व मौखिक परंपरेने चालत आले आहे. ऐकून, पाहून मी शिकलो आणि छंद जडला. आपली परंपरा आहे, धार्मिक कार्य आहे, यामुळे यातून फारसे काही भागत नसले तरी ती परंपरा पुढे चालवली पाहिजे, यासाठी गोंधळ-जागरण करीत आहे. यापुढेही करीत राहणार आहे.
-----
गोंधळाची पंचपदी
-----
मनोज धुमाळ यांनी सांगितले, घटगादीची पूजा मांडल्यानंतर तेहतीस कोटी देवांना गोंधळाला येण्याचे गाण्यांतून आवाहन करतो. आवाहनानंतर गोंधळाला सुरवात होते. नंतर गणपती स्तवन, देवीचा गोंधळ, गुरूंचे गाणे, खंडोबाचे गाणे, जोगवा आणि आरती असा पाच नामांचा, पाच तत्त्वांचा पंचपदी पारंपरिक गोंधळ घालतो. पारंपरिक गोंधळ रात्रभर घालायचा असेल तर कथा सांगत असतो. त्यात "जांभूळ आख्यान', "निळावंती', "श्रीकृष्णाची चेंडू फळी', "गिरिजा स्वयंवर', "पतिव्रतेची कथा', "नवनाथांची कथा' अशा कथा कधी गीतांमधून, तर कधी निरुपणाच्या माध्यमातून श्रोत्यांना सांगून त्यांचे मनोरंजन, प्रबोधन करीत रात्र जागून काढत असतो. पहाटे गवळण, अभंग गाऊन शेवटाला साडेतीन पीठांपैकी एका देवतेची पहिली कोल्हापूरची लक्ष्मी, दुसरी रेणुकामाता, तिसरी तुळजाभवानी आणि सप्तशृंगी अशी ही साडेतीन पीठांची आरती करून गोंधळ पूर्णत्वाला नेला जातो.
वडवणी येथील शेषरावबाबा गोंधळी यांच्या सहाव्या पिढीतील आणि सध्या सातवीत शिकणारा ओंकारही वडील मनोज यांच्यासोबत गोंधळ घालायला जातो; मात्र त्याने आपण शिकून मोठे होऊन भारतीय सैन्यात जाऊन देशाचे रक्षण करणार असल्याचे सांगितले.
-----
देहावरची बाराखडी
-----
रात्रभर गोंधळ-जागरण सुरू असते. गोंधळीबुवा प्रेक्षकांच्या गर्दीत जातात, तेव्हा प्रेक्षकांपैकी कोणीही त्यांना जवळ बोलावून खूश होऊन बक्षिसी देतात तेव्हा त्यांचे नाव कानात सांगतात. मग गोंधळीबुवा गर्दीतूनच समोरच्या त्यांच्या सहकाऱ्यांना हातवारे, खाणाखुणा करून बक्षीस देणाऱ्याचे नाव सांगतात. समोरचे सहकारी खाणाखुणा व इशाऱ्याद्वारे सांगितलेले नाव बरोबर ओळखतात. या गुप्त भाषेला गोंधळ्यांच्या भाषेत देहावरची बाराखडी म्हणतात. मनोज यांनी सांगितले, की नाव ओळखण्याची बाराखडी कदम गोंधळ्यांची भाषा आहे; मात्र ही कला मी शिकून घेतली आहे.
-----------------
हे आहेत पाच प्रकार
-----------------
गोंधळ घालण्याचेही विविध प्रकार आहेत. त्यात पारंपरिक गोंधळ, भंदी गोंधळ, काकड्या गोंधळ, रहाटीचा गोंधळ. काकड्या गोंधळ घातल्यानंतर यजमानाच्या घरचे पाचजण हातामध्ये पेटता काकडा (पोत) धरून पोत नाचवत घटगादीला प्रदक्षिणा मारतात. रहाटीचा गोंधळ जेव्हा गुरू करून घ्यायचा असतो त्यावेळी घातला जातो. खड्ड्यात जळते निखारे टाकलेले असतात. त्या निखाऱ्यावरून दीक्षा घेणारा चालत जातो आणि नंतर त्याला दीक्षा दिली जाते. त्यावेळी रहाटीचा गोंधळ घातला जातो.
--------------------------

Friday, May 25, 2018

वाचलेल्या अन्नाने भागवली 35 हजार भुकेल्यांची भूक


लग्नसोहळ्यांतील जेवणावळीत भरपेट जेवण करून ढेकर देत प्लेटमध्ये मोठ्या प्रमाणात शिल्लक राहिलेले अन्न फेकले जाते; मात्र दुसरीकडे अनेकांना जेवण मिळत नाही. हेच भुकेले चेहरे पाहून अस्वस्थ झालेल्या संवेदनशील व्यक्तींनी शहरात "अन्न वाचवा समिती' स्थापन करीत "मिशन फॉर हंगर फ्री सिटी'ने हा उपक्रम राबविला. त्याचेच फलित म्हणजे यंदाच्या लग्नसराईतील 42 मुहूर्तांमधून सुमारे 35 हजार लोकांना पुरेल इतके अन्न जमा करून गरजूंपर्यंत ते पोचविण्यात आले.
दिवाळीपासून जुलैअखेरपर्यंत यंदा 54 लग्नमुहूर्त आहेत. त्यात जूनमध्ये पाच; तर जुलैमध्ये सात मुहूर्त आहेत. "अन्न वाचवा समिती'चे अनंत मोताळे यांनी सांगितले, की दिवाळीपासून आतापर्यंत 42 लग्नमुहूर्त होते. या काळात शहरातील सर्व मंगल कार्यालयचालकांशी यापूर्वीच अन्न वाचविण्याच्या मोहिमेत योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार त्यांच्याकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मंगलकार्यालयांकडून साधारणत: एका मुहूर्तावर पात ते सहा हजार लोकांना पुरेल इतके शिल्लक राहिलेले अन्न मिळाले. याशिवाय हनुमान जयंतीच्या दिवशी झालेल्या भंडाऱ्यातून आठ हजार लोकांना पुरेल इतकी बुंदी मिळाली होती. जमा झालेले सर्व अन्न रेल्वेस्टेशन, बसस्थानके, उड्डाणपुलांचा परिसर, मंदिरांबाहेर बसणारे भिक्षेकरी, रात्रनिवारागृहांमध्ये राहणारे निराधार, रस्त्यांच्या कडेने पाल ठोकून राहणाऱ्या गरजूंना वाटण्यात आले. यासाठी मोताळे, ऍड. श्रीचंद जिग्यासी, चंद्रकांत वाजपेयी, राजेंद्र वाहुळे, रूपाली वाहुळे, स्वाती कुलकर्णी आदींनी पुढाकार घेतला.